सोलापूर : सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोलापुरात रुजू झाल्यानंतर पोलिस चौक्यांमधून चालणारे कामकाज पूर्णपणे बंद करून ते कामकाज पोलिस ठाण्यांमधून चालू केले. पोलिस चौकीतून कर्मचारी गुन्हे दाखल करताना अनेक चुका व नागरिकांना त्रास देण्याचे काम करीत होते, हे वरिष्ठांच्या निदर्शनास आले होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान चार वर्षानंतर बंद झालेल्या पोलीस चौक्या सुरू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे. धुळखात पडून असलेल्या पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेसह नागरिक आणि काही सामाजिक संघटनांनी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली होती. महिना दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने सर्व पोलीस चौकी पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू होतील अशी माहिती आयुक्त राजकुमार यांनी दिली.