सोलापूर – प्रकाशनंद सेवा संघ आणि शेठ गुलाबचंद लादूराम तोष्णीवाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ३७ व्या मोफत नेत्र मोतीबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नवनीत हॉस्पिटल (अनेक्स) येथे करण्यात आले होते. हे शिबीर अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी प्रकाशानंद सेवा संघ आणि तोष्णीवाल कुटुंबाच्या कार्याचे कौतुक केले. “समाजासाठी हे कार्य आदर्शवत असून सेवा संघाचे योगदान मोठे आहे,” अशा शब्दांत त्यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.
संघाचे मुख्य विश्वस्त राजेशम येमूल यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की: आतापर्यंत २४०० लोकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ४ वेळा बाल आरोग्य शिबीर भरवून ४८३ बालकांची तपासणी व मोफत औषधोपचार केले आहेत. ९ वेळा रक्तदान शिबिराद्वारे ६७९ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि पाट्यांचे वाटपही केले जाते.
डॉ. नवनीत तोष्णीवाल यांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद केले आणि उपस्थितांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तोष्णीवाल ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, डॉ. निखिल तोष्णीवाल, डॉ. आयुषी तोष्णीवाल, बाळासाहेब राशीनकर तसेच विदेशी डॉक्टर्स आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रकाशानंद सेवा संघाचे विश्वस्त नरसप्पा सामलेटी, अजय कोंडा, अविनाश दासरी, अमित पटेल, शरद वोल्ली, चंद्रमोगली कमटम, लक्ष्मीकांत गडडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी देवेंद्र शित्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



