१८ जुलै रोजी स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन…
सोलापूर – जगविख्यात लोककलावंत, लेखक, आणि क्रांतिकारक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती महोत्सवाला १ ऑगस्टपासून सोलापुरात भव्य प्रारंभ होणार असून, ३ ऑगस्ट रोजी भव्य दिव्य मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे.तत्पूर्वी, अण्णा भाऊ साठे यांचा ५६ वा स्मृतिदिन १८ जुलै रोजी साजरा केला जाणार असून, या दिवशी सोलापुरातील अण्णा भाऊ साठे चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध सामाजिक संस्थांच्या वतीने रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, आदरांजली गीत गायन तसेच जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी राज्यमंत्री तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे संस्थापक उत्तमप्रकाश खंदारे यांनी दिली.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने जयंती उत्सव काळात अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या महोत्सवात अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी १०० हून अधिक मंडळे सहभागी होणार आहेत. यापैकी सुमारे ५५ ते ६० मंडळे त्यांच्या जीवनकार्यावर आधारित देखावे सादर करणार असून, त्यातून त्यांच्या कार्याचे स्मरण आणि प्रबोधन होणार आहे.
जयंतीच्या दिवशी निघणारी भव्य मिरवणूक रात्री १० वाजेपर्यंत नियोजित असली, तरी सहभागी मंडळांची संख्या आणि देखाव्यांच्या स्वरूपामुळे मिरवणुकीसाठी वेळ अपुरा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरवणुकीची वेळ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी यावेळी अनेक मंडळांच्या वतीने करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला मध्यवर्ती महोत्सव समितीचे अध्यक्ष शांतीलाल साबळे,सुरेश पाटोळे, महादेव भोसले, गोविंद कांबळे, लक्ष्मण दुणगे, सतीश बगाडे, विशाल लोंढे, रजनी डोलारे आदी उपस्थित होते.