’सकल हिंदू समाजाच्या वतीने आज (रविवारी) मुंबईत ’हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरण व ’लॅण्ड जिहाद’ विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा, याच पार्श्वभूमीवर हा मोर्चा दादर (प) येथील शिवाजी पार्क मैदानातून निघाला आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडनंतर देखील अशा काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे धर्मांतर कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू सामाजार्फात केली जात आहे.
मुंबईतील हिंदू बांधवांची ताकद एकत्र रस्त्यावर उतरावी, तसेच हिंदू म्हणून एकत्र येऊन या मोर्चातून समाजाला महत्त्वाचा संदेश द्यावा, या उद्देशाने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे. या मोर्च्यात भाजप, शिंदे गटाचे नेते सहभागी झाले आहेत. मात्र ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या मोर्चाकडे पाठ फिरवल्याचे सध्या तरी चित्र आहे.
हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी यात सहभागी होणे अपेक्षीत होते, मात्र भाजप, शिंदे गट वगळता अन्य पक्षांनी या मोर्चात सहभागी होण्याचे टाळले आहे. महिलांचा या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.भाजपचे नेते, किरीट सोमस्या, प्रविण दरेकर, अतुल भातखळकर, चित्रा वाघ या मोर्चात सहभागी आहेत. हा मोर्चा शिवसेना भवनासमोरुन जात आहे.
‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आणि धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदे लागू करण्याच्या मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्यावतीने ’हिंदू जनसंघर्ष मोर्चा’त घाटकोपर येथे हजारो हिंदू भगिनी आणि बांधव रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतून विविध संप्रदायांचे प्रमुख, हिंदू संघटना सहभागी झाल्या आहेत.
दुसरीकडे लिंगायत समाजाचा आज मुंबईत राज्यव्यापी महामोर्चा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी लिंगायत समाजाने आज महामोर्चाची हाक दिली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर हा मोर्चा सुरू झाला आहे.