येस न्युज मराठी नेटवर्क । शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक झाली असून शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का? अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे. ठाकरे सरकारने शरजीलला पळून जाण्यात मदत केली, असा गंभीर आरोपही शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
“शरजीलला पळून जाण्यात मदत केल्यानंतर, भाजपाने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु हे म्हणणं म्हणजे पश्चातबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचं काम का केलं हे स्पष्ट करावं,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. “शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण परदेशातून कोणी आपल्या देशाच्या विषयावर टिप्पणी, बदनामी केली तर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावं.” असं आशिष शेलार यांनी म्हटलं.