येस न्युज नेटवर्क : मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत, तर तिथेच समोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात घेतली होती. मात्र, आपण असं करणार नसल्याचं म्हणत मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी त्याविरोधी भूमिका घेतली. या मुद्द्यावरून पक्षानं त्यांच्यावर कारवाई करत त्यांची शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी अजूनही आपण मनसेमध्येच असल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी कारवाईविषयी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
वाद घालण्याची आपली कधीही भूमिका नव्हती, असं वसंत मोरे म्हणाले आहेत. “मला नेहमी जी भीती वाटत होती ती हीच होती. हीच भूमिका मी पक्षासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. २००७पासून १७पर्यंत इथले मुस्लीम बांधव एका हिंदूसाठी कायम पुढे आले आहेत. पण यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे, काहीतरी भूमिका घ्यायची, एकमेकांशी वाद घालायचे ही माझी कधी भूमिका नव्हती कधी”, असं मोरे म्हणाले आहेत.