शिक्षकांमुळे विद्यार्थी घडतो. पुढे तो देशाचा, राज्याचा कणा बनतो. तसाच तो कुटुंबकर्ताही होतो. अशा या विद्यार्थ्यांना घडविणार्या गुरुजनांच्या, शिक्षकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची गरज आ. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. ब्रेन शैक्षणिक समुपदेशन केंद्र , लायन्स क्लब सोलापूर मेट्रो , एज्युसेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित स्कूल ऑफ मेरिट या पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रा. किरण कुलकर्णी, ब्रेन संस्थेच्या शलाका कुलकर्णी, लायन्स क्लब सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष ईश्वर झुंजा, मेहबूब शेख आदी उपस्थित होते.
दहावी परीक्षेत उत्कृष्ट निकाल लागलेल्या 30 प्रशालेच्या संचालक , प्राचार्यांचा व शिक्षकांचा यावेळी आ. शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमापनासाठी प्रा. रोहन कुर्री यांनी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या बुद्धी व क्षमता विश्लेषण चाचणीविषयी याप्रसंगी माहिती दिली.
याप्रसंगी हेमा चिंचोळकर, जब्बार शेख, राजेंद्र लिबिंतोटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. किरण कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती वैशाली ताटी नवीन महेश्वर, नितीन बु-हाणपुरे यांनी परिश्रम घेतले.
यांचा झाला विशेष सन्मान
आंतरराष्ट्रीयख्यातीचा बाल पपेटीयर सोहम येमुल. स्वतःचे स्टेम सेल देऊन छोट्या भावाचे प्राण वाचविणार्या ईश्वरी माने या विद्यार्थिनीचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सोहम याने कटपुतळीचा प्रयोग सादर केला. श्री चौंडेश्वरी प्रशालेचे इंग्रजी शिक्षक शहाजी ठोंबरे यांचा प्रज्ञावंत शिक्षक असा गौरव करण्यात आला.