येस न्युज मराठी नेटवर्क : तोटय़ात असलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूहाची बोली सर्वश्रेष्ठ ठरली असून, समाजमाध्यमांवर मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या या निर्णयाला सरकारने अद्याप अधिकृतपणे दुजोरा मात्र दिलेला नाही. मात्र असं असलं तरी एअर इंडियाला उभारी देणाऱ्या या बातमीचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कंपनी टाटांच्या ताब्यात जाण्याआधीच दिसू लागलाय. २०१७ नंतर पहिल्यांदाच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी पगार देण्यात आलाय. मागील अनेक वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना अनियमित वेतनाचा फटका बसला असतानाच हा नवीन टाटा इफेक्ट त्यांना सुखद धक्का देणार आहे.
याला तुम्ही हवं तर टाटा इफेक्ट म्हणून शकता मात्र आम्हाला आमच्या वेतनातील बेसिक सॅलरी यंदा एक तारखेलाचा मिळालीय. मी २०१७ पासून कंपनीत काम करतोय पण हे असं पहिल्यांदाच घडलं आहे, असं एका कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या या सरकारी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला जात नव्हता. २०१७ पासून पहिल्या आठवड्यानंतर किंवा १० तारखेच्या आसपास पगार दिला जायचा.