पंढरपूर : तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. वीज पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी पंढरपूर – बीड राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन केले आहे, दरम्यान आज सायंकाळ पर्यंत जर महावितरण ने शेती पंप वीज जोडणी केली नाही तर महावितरण अधिकाऱ्यांना उलटे टांगण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
महावितरण कडून तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा शेती पंपाचा वीज पुरवठा पाच दिवसांपासून बंद केला आहे. थकीत वीज बिलापोटी शेत पंपाच्या वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे पिके जळत आहेत. जनावरांना प्यायला पाणी नाही. कोरोना काळ सुरु झाल्यापासून शेतपंपाची वीजबिले भरायची ठाकली आहेत अशातच ऊर्जामंत्र्यांनी वीजबिलासाठी अधिकाऱ्यांकडून तगादा लावला जाणार नाही अस आश्वासनही दिल होत. मात्र पुन्हा महावितरण ने करायचा तोच कारभार केला होता. अशातच आता वीजबिल भरले नाही म्हणून पंढरपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा पाच दिवसांपासून बंद केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंढरपूर बीड रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांनी रोपळे गावात रस्ता रोको केला. जवळपास दोन तास शेतकऱ्यांनी रस्ता अडवला. आज सायंकाळ पर्यंत जर महावितरणने शेती पंप वीज जोडणी केली नाही तर महा वितरण कार्यालयात जनावरे बांधणार आणि अधिकाऱ्यांना उलटे टांगन्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.