पुणे : पुण्याच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला. आर. अश्विन याने आघाडीच्या तिघांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर उरलेल्या सर्व विकेट्स वॉशिंग्टन सुंदरनं आपल्या खात्यात जमा केल्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताकडून एका डावात सर्वच्या सर्व १० विकेट्स ऑफ स्पिनरनं घेतल्याचे पाहायला मिळाले.
३ विकेट्स अश्विनला; उरलेल्या ७ विकेट्स वॉशिंग्टनच्या नावे
न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कर्णधारानं डेवॉन कॉन्वेच्या साथीनं न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर ३२ धावा असताना अश्विननं न्यूझीलंड कॅप्टनच्या रुपात टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूनं डेवॉन कॉन्वे मैदानात तग धरून उभा राहिला. विल यंगसोबत त्याने ४४ धावांची भागीदारी रचली. ही जोडी सेट होतीये असे चित्र निर्माण झाले असताना अश्विन पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला धावला. विल यंगला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. कॉन्वेच्या रुपात अश्विननं वैयक्तिक आणि संघासाठी तिसरी विकेट घेतली. इथून पुढच्या सर्वच्या सर्व विकेट्स वॉशिंग्टन सुंदरला मिळाल्या.