सोलापूर : शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये हे आहेत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ठरवून दिलेले दरपत्रक. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रचार खर्चासाठी अशा एकूण २५२ वस्तूंची दरसुची जाहीर केली असून ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी केलेला खर्च उमेदवाराला निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. उमेदवारांनी केलेल्या खर्च आणि सादर केलेल्या खर्चाची निवडणूक शाखेकडून पडताळणी केली जाणार आहे. या वेळी निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला ४० लाखांपर्यंत खर्च करण्याची उभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा २८ लाखांची होती. यामध्ये या वेळी वाढ करण्यात आली आहे. बैठका, सभा, रॅली, जाहिरात पत्रक, वाहनांचा खर्च आदींचा यामध्ये समावेश आहे. हा सर्व खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन राहून करावा लागणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने खर्चाचे दर निश्चित केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून हा खर्च ग्राह्य धरला जातो. यासाठी उमेदवारांना राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँकेत खाते उघडावे लागते.
बँडपथक वीस माणसांसाठी प्रतिदिन एक हजार रुपये, पाच माणसांचे पोवाडा पथक पाच हजार रुपये, तीन माणसांचे हलगी पथक १५०० रुपये, २० जणांचे झांजपथक १० हजार रुपये, शिंगवादन प्रतिव्यक्ती तीनशे रुपये, बँजो ग्रुप चार माणसांसाठी तीन-चार तासांसाठी २५०० रुपये, पुष्पगुच्छ मोठा २२० रुपये, पुष्पगुच्छ मध्यम १८० रुपये, पुष्पगुच्छ लहान शंभर रुपये, हार मोठा ३२५, मध्यम २३५ रुपये, लहान १२५ रुपये असा दर ठरवण्यात आला आहे.
पदार्थ आणि दरपत्रक
चहा आठ रुपये, कॉफी १२ रुपये, बिस्कीट पुडा दहा रुपये, कोल्ड्रिंक वीस रुपये, कोकम सरबत, लस्सी, पोहे, उपीट, शिरा प्रत्येकी १५ रुपये, वडापाव १० रुपये, इडली २५ रुपये, मिसळ ४९ रुपये, समोसा पंधरा रुपये, शाकाहारी जेवण सत्तर रुपये, मांसाहारी जेवण १२० रुपये.