राजकीय कारकीर्द कशी होती?
सीताराम येचुरी यांनी १९७५ च्या आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी आंदोलने केली आणि यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर ते CPI(M) चे एक महत्त्वाचे नेते बनले. २००५ मध्ये त्यांनी राजकीय कार्यकारिणी समितीमध्ये प्रवेश केला आणि २०१५ मध्ये पहिल्यांदा पक्षाचे सरचिटणीस झाले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने देशातील विविध आंदोलने आणि कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे. त्यानंतर २०१८ आणि २०२२ साली त्यांची पुन्हा याच पदासाठी फेरनियुक्ती करण्यात आली होती.
राज्यसभेचे खासदार ते यूपीए सरकारमधील महत्त्वाचे नेते
सीताराम येचुरी यांनी २००५ ते २०१७ दरम्यान राज्यसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले. संसदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर, विशेषत: कामगार, गरीब आणि मध्यमवर्गीयांचे अधिकार आणि समस्यांवर आवाज उचलला. त्यांची संसदेतील अनेक भाषणे गाजली. येचुरी कोणती भूमिका मांडतात याकडे फक्त डाव्या चळवळीतीलच नाही तर इतर पक्षाच्या नेत्यांना आणि राजकीय अभ्यासकांनाही कुतूहल असे. श्रमिक, कामगारांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी संसद आणि रस्त्यावरची लढाई नेहमीच लढली. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर कायम भूमिका घेतली आणि संघ परिवाराच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहमी विरोध केला.
भाजपा आणि संघाचे कडवे टीकाकार
भाजपा आणि संघावर काँग्रेसपेक्षाही अधिक कडवी टीका सीताराम येचुरी यांनी केलेली आहे. लोकसत्ताच्या लोकसंवाद या कार्यक्रमात राम मंदिरावर बोलताना ते म्हणाले होते, “महात्मा गांधी किंवा राम मनोहर लोहिया यांनी रामाचा उल्लेख केला असला तरी तो राजकारणासाठी नव्हता. त्यामागे रामराज्य किंवा रामाची पूजा करणे हा उद्देश होता. भाजपकडून रामाचा नेहमी राजकीय फायद्यासाठीच वापर केला गेला.
यामुळेच भाजपची मंडळी ‘जय श्रीराम’ असाच उल्लेख करतात. ते ‘जय सियाराम’ असे म्हणत नाहीत. भाजप किंवा रा. स्व. संघाचे हिंदूत्व हे नेहमीच उच्चवर्णीयांचे किंवा ब्राह्मणवादी राहिले आहे. त्यांच्या हिंदूत्वाचा सारा ढाचा हा मनुस्मृतीवर आधारित आहे. समाजाची रचना कशी असावी याचे स्वरूपही संघ परिवाराने मनुस्मृतीनुसारच केले आहे. महिलांना कशी वागणूक दिली जाते हे त्याचेच उदाहरण आहे. खाप पंचायतींना अजूनही प्रोत्साहन दिले जाते. मनुस्मृतीला एक प्रकारे बळ देण्याचे कामच या सरकारने केले आहे. उच्चवर्णीयांचेच हित जपले जाते हेसुद्धा अनुभवास आले आहे.”