मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा यावर्षीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक, गुरू विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली असून राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, उस्ताद फय्याज हुसेन खाँ, पं. उद्धव आपेगावकर, डॉ. राम देशपांडे, श्री श्रीनिवास जोशी यांचा पुरस्कार निवड समितीत समावेश होता. समितीने सन 2020 साठीच्या पुरस्कारासाठी एन. राजम यांची निवड केली आहे. व्हायोलिन वादनाच्या क्षेत्रातील अत्यंत आदरणीय अशा एन. राजम यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांच्या वडिलांकडे कर्नाटकी पद्धतीने व्हायोलिनचे शिक्षण सुरू केले. त्यांची तयारी बघून वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांना अनेक मोठ्या कलाकारांसोबत साथ करण्यासाठी भारतभर दौरे करण्याची संधी मिळाली. पं. ओंकरनाथ ठाकूर यांच्या गायकीने प्रभावित झाल्यामुळे त्या हिंदुस्तानी संगीताकडे आकर्षित झाल्या.