येस न्युज नेटवर्क : राज्यातील साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून समोर आली आहे. तर 39 लाख विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदच होत नाही. यामुळे शिक्षकांना सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना मोठी अडचण येत आहे. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन, मोफत पुस्तके-गणवेश मिळवण्यासाठी सरल प्रणालीत आधार कार्ड नोंदणी गरजेची आहे.
दरवर्षी राज्यातील शिक्षकांकडून सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरली जाते. मागील तीन महिन्यापासून शिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचं काम करत आहेत. सरल प्रणालीमध्ये माहिती भरत असताना यामध्ये विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी सुद्धा गरजेची आहे. मात्र शिक्षण विभागाकडून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. तब्बल साडे 19 लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने सरल प्रणालीमध्ये त्यांची नोंद करण्याचं काम अडलं आहे. सरल प्रणालीमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीनुसार शिक्षकांचे सुद्धा समायोजन दरवर्षी शिक्षण विभागाकडून केलं आहे.