येस न्युज नेटवर्क : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे देश सोडून मालदीवमध्ये पळून गेले आहेत. राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर श्रीलंकनवासीयांचा संताप उफाळून आला आहे. राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलक प्रचंड संख्येने जमा झाले आहेत. जनतेचा तीव्र विरोध पाहता पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.
संतप्त जमावाने पीएम हाऊस आणि राष्ट्रीय टीव्ही ‘रूपवाहिनी’च्या स्टुडिओवर कब्जा केला आहे, तर हजारो लोक संसद भवनाकडे कूच करत आहेत. नॅशनल टीव्हीवर ताबा घेतल्यानंतर वाहिनी बंद झाली. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अहवालानुसार, आतापर्यंत 30 हून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. पंतप्रधान रानिल विक्रनसिंघे यांची देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, आंदोलकांनी या प्रकरणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांवर हेलिकॉप्टरद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवेत गोळीबार केला जात आहे.