राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त सोलापूर शहरातील संघ दृष्ट्या १६ नगरांतील अण्णाभाऊ साठे नगरातील अवंती नगर, वसंत विहार, दमाणी नगर, देगाव, निराळे वस्ती, बाळे, केगाव ,देगाव इ परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजनाने गृह संपर्क कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात सुरुवात केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदर अभियानामध्ये समाजातील सर्व घरांमध्ये जाऊन संघ कार्याची माहिती देण्यात येत आहे. तसेच हिंदू धर्मातील जातीपातींचे भेद नष्ट करून सामाजिक समरसता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. या भेटीमध्ये स्वयंसेवक विविध कुटुंबांना संघाची स्थापना कधी झाली, कशासाठी झाली, कोणी केली, संघाने मागील शंभर वर्षांत कोणकोणते कार्य केले आणि भविष्यातील संघाचे ध्येय अधोरेखित करणारे पंच परिवर्तनाचे ५ बिंदू सर्व कुटुंबांसोबत चर्चिले जाणार आहेत.
१)कुटुंब प्रबोधन
२)सामाजिक समरसता ३)पर्यावरण संरक्षण
४)स्वबोध आणि
५)नागरी शिष्टाचार या पंच परिवर्तनाच्या ५ गोष्टींबद्दल स्वयंसेवकांतर्फे समाजामध्ये घरोघरी जाऊन गृहसंवाद कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पंच परिवर्तनामुळे समाजात राष्ट्र प्रेमाची भावना निर्माण होऊन भारताची संघटित शक्ती वाढणार आहे.
या गृह संपर्क कार्यक्रमादरम्यान संघाची माहिती पुस्तिका कुटुंबांना देण्यात येत आहे. संघाच्या या गृह संपर्क कार्यक्रमाच्या उपक्रमामुळे भारतातील सामाजिक सलोखा ,बंधुत्व आणि परस्पर प्रेमभावना वाढीस लागून भारताला परम वैभवाकडे पुनर्स्थापित करण्यासाठी हे एक खूप मोठे पाऊल समजले जात आहे.संघाचा सदर गृह संपर्क कार्यक्रम १ ते २१ फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण भारतभर आयोजित केला आहे. त्यानंतर संपूर्ण भारतभर ठीक ठिकाणी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये समाजातील वेगवेगळ्या संस्थांद्वारे हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे.

