सोलापूर : ट्रॅक्टरची पिन निसटल्याने त्यास जोडलेले दोन्ही ट्रेलर शनिवारी माळीनगर पोलिस चौकीत घुसले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विक्री करणारी महिला थोडक्यात बचावली. सोमवारच्या आठवडा बाजारादिवशी हा प्रसंग घडला असता तर मोठा अनर्थ झाला असता, अशी चर्चा आता माळीनगरात सुरू आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे निर्बंध व नियंत्रण नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
माळीनगरहून टेंभुर्णीच्या दिशेने हा ट्रॅक्टर निघाला होता. त्यास जोडलेले दोन्ही ट्रेलर ऊसविरहित होते. ट्रॅक्टरला जोडलेली ट्रेलरची पिन निसटल्यावर ट्रॅक्टर तसाच पुढे गेला. ट्रॅक्टर चालकाला त्याचा पत्ताच नव्हता. पिनला असलेली लहानशी क्वाटर पिन चालकाने बसवली नव्हती. त्यामुळे हा प्रकार घडला. दरम्यान, ट्रॅक्टरला जोडलेले दोन्ही ट्रेलर वेगात काही अंतर ट्रॅक्टरच्या मागे धावत जाऊन अखेर पोलिस चौकीत शिरले. या घटनेतील ट्रॅक्टर व दोन्ही ट्रेलरला क्रमांक नव्हते हे विशेष. माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्यास हा ट्रॅक्टर ऊस वाहतूक करत आहे.
या घटनेत भाजीपाला विक्रेती महिला जखमी झाली असून, ती बालंबाल बचावली. तिचा भाजीपाला इतस्ततः विखुरलेल्या स्थितीत दिसत होता. विजेच्या वायर, टेलिफोन वायर, टीव्हीच्या केबल यामध्ये तुटल्या. पोलिस चौकीचे कंपाउंड, बोर्ड याचे नुकसान झाले आहे. या पोलिस चौकीच्या समोरच रस्त्याच्या कडेला विजेचा ट्रान्सफॉर्मर आहे. हे ट्रेलर ट्रान्सफॉर्मरला धडकले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. माळीनगरचा आठवडा बाजार सोमवारी पोलिस चौकीच्या परिसरातच भरतो. त्या दिवशी ही घटना घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे यापुढे येथे आठवडा बाजार भरू देणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. उसाच्या अति वजनाने ट्रेलरचे टायर रस्त्यावरून जाताना फुटत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकदा उसाने भरलेले ट्रेलर रस्त्यावरच आडवे झाल्याचे पाहावयास मिळत आहे.