- सीआयडी या लोकप्रिय मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणारा अभिनेता अर्पित कपूर याच्या पत्नीचे चोरीला गेलेलं सोन्याचं गंठण सोलापूर पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधून काढलं आहे. अर्पित एका लग्नासाठी त्याच्या पत्नीसोबत सोलापूरला गेला होता. त्यावेळी त्याच्या पत्नीचं गंठण चोरीला गेलं होतं.
अभिनेता अर्पित कपूर हे आपल्या मेहुण्याच्या लग्नासाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांची पत्नी मेकअप करण्यासाठी रूममध्ये गेली. तेव्हा सोन्याचे मंगळसूत्र मेकअप टेबलासमोर होते. मेकअप केल्यानंतर अर्पित कपूर यांची पत्नी श्रमिका मंगळसूत्र न घेताच गडबडीत निघून गेली. ही बाब तिला दोन तासानंतर आठवली. परत रुममध्ये जाऊन पाहिल्यानंतर मंगळसूत्र तिथे नव्हते. त्यानंतर तिने हरवलेल्या मंगळसूत्राचा शोध घेतला पण ते मिळाले नाही. यामुळे त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.
- मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर ज्यांच्यावर संशय होता त्या सर्वांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान मेकअप करणाऱ्या महिलेवर त्यांचा संशय बळावला. चौकशीत महिलेने आपणच दागिने घेतल्याचे कबूल केले. अवघ्या काही तासात घटनेचा तपास करुन पोलिसांनी अर्पित कपूर यांच्याकडे हे दागिने सुपूर्द केल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
- दरम्यान पोलिसांनी दागिने चोरलेल्या महिलेविरोधात फिर्याद (FIR) द्यायला सांगितले असता कपूर यांने फिर्याद द्यायला नकार दिला. महिलेने चूक झाल्याचे मान्य केले आहे. गुन्ह्यामुळे एखाद्याचे करिअर बरबाद होऊ शकते. त्यामुळे आपण तक्रार देत नाही आहेत. मात्र पोलिसांनी ज्या गतीने हा तपास केला ते पाहून आनंद झाला अशी भावना अभिनेता अर्पित कपूर आणि त्यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे.