सोलापूरहून मुंबई, बंगळुरू विमानसेवा १५ ऑक्टोबरपासून : पालकमंत्री जयकुमार गोरे भरून काढतयात विकासाचा बॅकलॉक : केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विशेष सहकार्य..
सोलापूर – सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचे पालकत्व घेतलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या पंधरवड्यात सोलापूर- मुंबई विमानसेवेची भेट दिली आहे. १५ ऑक्टोबर पासून सोलापूर – मुंबई आणि सोलापूर – बंगळुरू विमानसेवा सुरू होत आहे, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी दिली. सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू होण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष सहकार्य केले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या प्रवासात मोठा टप्पा गाठल्याची समाधानकारक प्रतिक्रिया सोलापूरकर व्यक्त करत आहेत.
सोलापुरातून मुंबईसाठी विमान सेवा सुरू व्हावी याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या दिल्ली येथील कार्यालयातील अनेक बैठका झाल्या. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातदेखील आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी बाबत चर्चा केली होती. यावेळी मोहोळ यांनी सोलापूरहून मुंबई तसेच बंगळुरूसाठी देखील विमानसेवा सुरू करू असे आश्वासन दिले होते. सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवा सुरू होण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विशेष सहकार्य लाभल्याने सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचा महामार्ग मोकळा झाला आहे. या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे.
दोन्ही विमानसेवांचे बुकिंग २० सप्टेंबरपासून सुरू होणार असून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.
अशा असतील विमानसेवेच्या वेळा
सोलापूर मुंबई दुपारी १२.५५ वाजता, मुंबई – सोलापूर दुपारी २.४५ वाजता, बंगळुरू – सोलापूर सकाळी ११ वाजता, सोलापूर – बंगळुरू दुपारी ४.१५ वाजता
‘सोलापूरसारख्या ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई व बंगळुरूशी जोडणं ही काळाची गरज होती. या हवाईसेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहेच, शिवाय या भागात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल, असा मला विश्वास आहे. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
देवा भाऊ आणि जया भाऊंकडून भरून निघतोय सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉक
महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयाभाऊ म्हणून लोकप्रिय असणारे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढत आहेत. यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. होटगी रस्ता विमानतळावरून विमानसेवा सुरू होऊ शकत नाही, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती. मात्र सोलापुरातून गोवा, मुंबई, बंगळुरू आणि भविष्यात तिरुपतीलादेखील विमानसेवा सुरू होत आहे. टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली होणारा सोलापूरचा विकास हेच उत्तर असणार आहे. त्यामुळे विरोधकांनी टीका करण्यापेक्षा भाजपा सरकार करत असलेल्या विकास कामातून बोध घ्यावा.— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य