सोलापूर :- प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 17 जून 2012 अन्वये लम्पी चर्मरोग (LSD-Lumpy Skin Disease) या रोगाचा अनुसूचित रोगाचा (Scheduled Disease) प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी सोलापूर जिल्हयातील नियंत्रितक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे.
आदेश पुढीलप्रमाणे….
लम्पी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निमूर्लन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास पूर्ण मनाई करण्यात येत आहे.
गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस पूर्ण मनाई आहे.
गोजातीय प्रजातीच्या गुरे यांचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास पूर्ण मनाई आहे. नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधीत झालेल्या गुरांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास पूर्ण मनाई आहे.नियंत्रीत क्षेत्राबाहेरील कोणतेही जनावर लम्पी चर्मरोगाच्या लसीकरणाचे एप्रिल २०२३ किंवा त्यानंतरचे प्रमाणपत्र असल्याशिवाय आणि सदरील लस घेऊन किमान २८ दिवस झालेले असल्याशिवाय या नियंत्रित क्षेत्रात आणण्यास बंदी करण्यात येत आहे.
बाधित परिसरात स्वच्छता ठेवून व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करावे व रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादीच्या नियंत्राणासाठी औषधांची फवासणी करावी.लम्पी चर्मरोगाचा विषाणू विर्यामधूनही बाहेर पडत असल्याने वीर्यमात्रा बनविणाऱ्या संस्थामार्फत होणारे वीर्य संकलन थाबवावे व वळूंची चाचणी करुन नकारार्थी आलेल्या वळूचे विर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगाकरिता वापर करावा.लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी सोलापूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती, नगर पंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका यांचे मार्फत यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे तसेच बाधित पशुधनाची काळजी घ्यावी व कीटकनाशक फवारणी मोहीम स्वरुपात राबविण्यात यावी.
आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या पशुपालक, व्यक्ति, संस्था प्रतिनिधी यांचे विरुध्द नियमांनुसार गुन्हा दाखल करणे तसेच कारवाई प्रस्तावित करण्यासाठी त्या त्या संबंधित कार्यक्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करणेत येत आहे. असेही आदेशात नमूद केले आहे.