सोलापूर – समर्पणातून सेवा करणारा केवट हाच प्रभु श्रीरामाचा परम सेवक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने आयोजित पुना गाडगीळ प्रायोजित दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणीच्या दुसऱ्या दिवशी श्रीराम सेवक केवट या विषयावर ते बोलत होते. लोकमान्य टिळक सभागृह (अॅम्फी थिएटर) मध्ये सकाळी 6.25 ते 7.30 या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.
अहंकारातून सेवा होत नाही. अहंकार बाजुला ठेवूनच समर्पणातून सेवा पूर्ण होते. प्रभु श्रीराम यांच्या वनवासादरम्यान भेटलेल्या केवट याने त्याचा व्यवसाय नावाडी असताना त्याने प्रभु श्रीराम, माता सिता आणि लक्ष्मण यांना नदी पार करण्यासाठी केलेली मदत त्याचप्रसंगी त्याने केलेली सेवा ही अदभुत आहे. या प्रसंगाचे वर्णन निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी अत्यंत रसाळवाणीतून मांडली. श्रीरामा बद्दल असलेली आत्मीयता दाखवून केवट याने श्रीरामाची केलेली सेवा त्यातूनच त्यांनी पदप्रक्षालन केलेले तीर्थप्राशन करण्याची परंपरा संपूर्ण जगासमोर आणली. याचे वर्णनही निरूपणकार घळसासी यांनी मांडले. भक्ताच्या भक्तीसमोर भगवंत नतमस्तक होतो याचे चित्रच केवट आणि श्रीराम यांच्या मध्ये निर्माण झाले. असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी पु ना गाडगीळचे व्यवस्थापक जितेंद्र जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते घळसासी यांना पुष्पहार, शाल, श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने तीन दिवस विवेकाची अमृतवाणीचे आयोजन करण्यात आली. त्यानंतर एक तास विवेकाची अमृतवाणीतून श्रीराम सेवक केवट यावर विवेचन झाले. हा कार्यक्रम सकाळी 6.25 वा. असतानाही रसिक श्रोत्यांनी अॅम्फी थिएटर भरून गेले होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर, हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे, कार्यवाह प्रशांत बडवे, अमोल धाबळे, गुरू वठारे, अविनाश महागांवकर, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर आदी उपस्थित होते. विवेकाची अमृतवाणीच्या तिसऱ्या दिवशी रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी श्रीराम भक्त शबरी या विषयावर विवेचन होणार आहे.