सांगली ( सुधीर गोखले) – सांगली आणि मिरज शहरासह सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये पर्जन्यमान समाधानकारक होत असून खरीप हंगामातील पेरण्यांनी गती घेतल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील मुख्य वारणा धरण आणि सातारा जिल्ह्यातील कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने जोर धरला असून आज अखेर वारणा धरण पन्नास टक्के भरले आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये मान्सुन ने सुरुवातीला दडी मारली होती जून उलटून गेला जुलै संपत आला पण पेरण्यासाठी आवश्यक पाऊस नसल्याने बळीराजा हवालदिल झाला होता मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ याठिकाणी पर्जन्यमान चांगले होण्याचा अंदाज आहे त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये संततधार सुरु आहे तसेच पाणलोट क्षेत्रामध्येही पर्जन्यमान चांगले होत असून वारणा धरणामध्ये पन्नास टक्के पाणीसाठा झाला आहे वारणा धरण क्षेत्रामध्ये जवळ जवळ २९ मिलीमीटर पाऊस झाला असून कोयना धरण क्षेत्रातही मंगळवारी सायंकाळ पर्यंत कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ५४ मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली तर एकूण पाणीसाठा २८.३२ टी एम सी पाणी साठा झाला होता.कोयना धरण क्षेत्रामध्ये चार दिवसांमध्ये तब्बल चार टी.एम.सी इतका पाणीसाठा झाल्याचे धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिराळा तालुक्यातील कोकरूड बंधारा पाण्याखाली
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात सोमवार पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे परिणामी वारणा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून तालुक्यातील कोकरूड येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम विभागातील नागरिकांना कोकरूड ला येण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर चा प्रवास करून तुरुक वाडी मार्गे यावे लागत आहे.