सोलापूर : शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय’ या जयघोषात आज दुपारी सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार झाला अन् चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अक्षता सोहळा पार पडताच ‘हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय’च्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. हा सोहळा पाहण्यासाठी आंध्र, कर्नाटक आदी राज्यांसह सोलापूर शहर-जिल्ह्यातील लाखो भाविक उपस्थित होते.


सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील हा अक्षता सोहळा मोठा असतो. यासाठी मानाच्या हिरेहब्बू वाड्यातून सातही नंदीध्वज सकाळी 7 वाजता सवाद्य मिरवणुकीने सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. हिरेहब्बू वाडा, कुंभारवाडा, दाते गणपती, दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे हे सर्व नंदीध्वज मोठ्या डौलाने आणि वाजत गाजत सिद्धेश्वर मंदिराजवळ १.१५ वाजताच पोहचले. बरोबर १.३० वाजता संमती कट्ट्याजवळ सातही नंदीध्वज एका रांगेत उभे करण्यात आले. यानंतर जलपुजन, सुगडी पुजन करून मानकरी शेटे यांनी संमती वाचन सुरू केले. २ वाजता अक्षता सोहळा सुरू झाला आणि अडीच वाजता संपला. सत्यम् सत्यम्…दिड्डम दिड्डम…चा जयघोष निघताच श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर दणाणून गेला होता.






हा सोहळा पाहण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. रोहित पवार, आ सुभाष देशमुख, आ विजयकुमार देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.