दिनांक ७ ते ११ जुलै २०२४ दरम्यान इंदौर येथे संपन्न झालेल्या ४० व्या सब जूनियर व ५० व्या जूनियर नॅशनल अक्वॅटिक चैम्पियनशिप २०२४ या राष्ट्रीय डायव्हींग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने ग्रुप-१, १९ वर्ष वयोगटात डायव्हींग- हायबोर्ड, या क्रिडा प्रकारात २८०.८० गुणासह सुर्वण पदक, १ मीटर स्प्रिंग बोर्ड डाइविंग मध्ये २६२.८० गुणासह सुवर्ण पदक, तर ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डाइविंग मध्ये २७७.१० गुणासह रौप्य पदक पटकावले आहे.
श्रावणीने आजवर डायव्हिंग प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत राज्य पातळीवर १६ गोल्ड आणि २ सिल्वर आणि १ ब्रांज पदक मिळवले आहे तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने ९ गोल्ड, ५ सिल्वर आणि २ ब्रांज पदके मिळविली आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने २ गोल्ड, १ सिल्वर आणि १ ब्रांज पदक मिळवले आहे.
या तिच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राला सन २०२३ व २०२४ च्या दोन्ही चॅम्पियन ट्रॉफी मिळवून दिल्या आहेत.
या विजयाचे श्रेय श्रावणीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे यांना जात असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रावणी घडत आहे.