संगमेश्वर कॉलेज दुसरे तर केबीपी पंढरपूरला तिसरे बक्षीस!
सांगोला, दि. 10- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 21 व्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषक बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजला मिळाले. तर तिसरे पारितोषिक पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पटकावले.
सांगोला येथील सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा 21 वा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवारी पारितोषिक वितरण झाले. समारोप समारंभास ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.लक्ष्मीकांत दामा, सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव उदयबापू घोंगडे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, व्यवस्थापन परिषदेचे सचिन गायकवाड, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. वीरभद्र दंडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, महोत्सव समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.


ललित विभागाचे विजेतेपद संगमेश्वर कॉलेजने पटकावले. वांग्मय विभागाचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभाग आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरला मिळाले. नाट्य विभागाचे विजेतेपद संगमेश्वर महाविद्यालयाने प्राप्त केले. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी कॉलेजला मिळाले. लोककला विभागाचे विजेतेपद शिवाजी महाविद्यालय बार्शी यांना देण्यात आले. नृत्य विभागाचे विजेतेपद एन. बी. नवले सिंहगड कॉलेज केगाव आणि सांगोला महाविद्यालय सांगोला यांना विभागून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.




गोल्डन गर्लचा किताब सई दरेकर आणि स्नेहल विधाते यांना, बार्शीचा प्रेम सरोदे गोल्डन बॉय!
युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीस गोल्डन गर्ल तर विद्यार्थ्यास गोल्डन बॉयचा किताब दिला जातो. यंदाच्या गोल्डन गर्लचा किताब समान गुण मिळाल्याने विभागून देण्यात आले. संगमेश्वर कॉलेजची सई दरेकर आणि बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल विधाते यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
युवा महोत्सवातून ऊर्जा, दिशा मिळते: मकरंद अनासपुरे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सांगोला महाविद्यालयाने आज येथे उत्कृष्ट अशा युवा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा मिळण्याबरोबरच एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. मी देखील युवा महोत्सवामधूनच घडलो आहे, असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. आयुष्यात यशासाठी कष्ट फार महत्त्वाचे असतात. केवळ रिल्स बनवून शॉर्टकट यश मिळवण्यापेक्षा कायम टिकणारे यश मिळवून आयुष्यात रियल बनावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. समाज व देशासाठी काम करावे असे आवाहन करण्याबरोबरच त्यांनी मातृभूमी व आपल्या भाषेवर प्रेम करण्याचा आग्रह केला.
यावेळी बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी आज सांस्कृतिक क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चांगले यश मिळवले आहेत. आज सांगोला महाविद्यालयाने या महोत्सवाचे यजमानपद स्वीकारून अतिशय उत्कृष्टरित्या विद्यार्थी कलाकारांची सोय केली. या संस्थेने उत्कृष्ट यजमानपदाचा एक आदर्श नमुना घालून दिला आहे. विद्यापीठ आज सर्व क्षेत्रात प्रगती करत असताना पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करून जवळपास सव्वा लाख झाडे विद्यापीठ कॅम्पस मध्ये लावली आहेत. सर्व महाविद्यालयांनी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
पुढील वर्षाचा 22 युवा महोत्सव सिंहगड कॉलेजमध्ये
21 व्या युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी सिंहगड कॉलेजची विद्यार्थिनी गौरी शिंदे हिने युवा महोत्सव विषयी मनोगत व्यक्त करताना म्हणाली की, सांगोला महाविद्यालयाने अतिशय उत्कृष्टरित्या युवा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थी कलाकारांची चांगली सोय केली, त्याबद्दल आभार. काहीजण कुजबूज करत असतात मात्र नियोजन करणाऱ्यांनाच कष्टाची माहिती असते. पुढच्या वर्षाच्या युवा महोत्सवाची जबाबदारी विद्यापीठाने सिंहगड कॉलेजवर सोपविल्यास आमच्या संस्थेचे सचिव संजय नवले यांनी ते निश्चितपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर कुलगुरू डॉ. महानवर यांनी पुढच्या वर्षाच्या आयोजनाबद्दल चिंता मिटल्याचे जाहीर केले. त्यावेळी व्यासपीठावर येऊन संजय नवले यांनी पुढील वर्षी युवा महोत्सव आम्ही घेऊ, असे जाहीर केले.