येस न्युज मराठी नेटवर्क : लॉकडाउनच्या काळात बंद असेलली मंदिरं पुन्हा एकदा खुली करण्यात आली असून ठिकठिकाणी दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या आहेत. शिर्डीमधील साई मंदिरही दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शिर्डीमध्ये फक्त राज्य नाही तर देश विदेशातून लोक दर्शनासाठी येत असतात. दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.
मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा असं आवाहन संस्थानकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.
शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाताय? मग आधी ही नियमावली नक्की वाचा
– दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन पास घ्यावा लागणार आहे.
– ठरवून देण्यात आलेली वेळ आणि तारखेनुसार भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे.
– ३००० भाविकांना ऑनलाइन पेड पास दिला जाणार आहे.
– एरव्ही आरतीसाठी २५० ते ३०० भाविक उपस्थित असत. मात्र यावेळी आरतीसाठी ५० जणांनाच सहभागी होता जाणार आहे. आरतीसाठी पास आरक्षित असणार आहे.
– हार, फुलं, प्रसाद मंदिरात नेता येणार नाही. समाधीला हात न लावता दर्शन घेता येणार.
– मोबाइल आणि इतर वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
– आरतीनंतर गावकऱ्यांना दर्शनासाठी विशेष प्रवेश दिला जाणार. मतदार ओळखपत्र दाखवल्यानंरच प्रवेश दिला जाईल.
– ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींना प्रवेश दिला जाणार नाही. राज्य सरकारनेच तसा आदेश दिला आहे.
– साई निवास व्यवस्थेसाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे.
– मास्क बंधनकारक असणार आहे.
– थर्मल स्क्रिनिंग आणि नियम पाळणं बंधनकारक आहे.