राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना धावपळ टाळून तब्येत सांभाळण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे त्यांचे पुढील 4 दिवसांतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीतील हाराकिरीनंतर शरद पवार यांनी आपले जनसंपर्क दौरे वाढवण्यावर जोर दिला आहे. ते सातत्याने राज्यभरात दौरे काढून पक्ष कार्यकर्त्यांसह जनसमान्यांशी संवाद साधत आहेत या माध्यमातून ते आपल्या पक्षाची पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती पुढे आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, शरद पवारांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना धावपळ टाळून विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
4 दिवस आराम करून पुन्हा सक्रिय होणार
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार पुढील आपल्या घरीच आराम करतील. त्यामुळे या कालावधीतील त्यांचे सर्वच पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. शरद पवार सध्या पुण्यात आहेत. ते लवकरच मुंबईतील आपल्या घरी परत येतील असे सांगितले जात आहेत. शरद पवार घशाचा संसर्ग व सर्दीने घेरल्याची माहिती आहे. 4 दिवस विश्रांती घेतल्यानंतर शरद पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती आहे.