सोलापूर : जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशॉफ्टचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योग समूहाने (Precision Industry Group) भारतातील पहिलीच इलेक्ट्रिक बस (Electric bus) बनवली आहे. डिझेल इंजिन काढून इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या बसची माहिती देण्यासाठी प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा (Yatin Shaha) यांनी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली व बसचे सादरीकरण केले. या वेळी पवार यांनी प्रिसिजन समूहाचे कौतुक करून पाठ थोपटली.
प्रिसिजन कंपनीने डिझेलवर चालणाऱ्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केले आहे. मध्यम आकाराची प्रवासी बस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित होण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याचे या वेळी प्रिसिजन कंपनीकडून सांगण्यात आले. या अत्याधुनिक बसबाबत माहिती दिली तेव्हा शरद पवार यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. इलेक्ट्रिक बसच्या कामासाठी मागील वर्षभर प्रोजेक्टवर पुणे येथे काम केले जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
आत्मनिर्भर भारत योजनेला अनुसरून टाकलेले पाऊल आहे. या बससाठी लागणारे 60 टक्के साहित्य भारतात तयार झालेले आहेत. इलेक्ट्रिक बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन प्रिसिजनने नेदरलॅंड्समधील इमॉस कंपनी संपादित केली होती. यापुढील काळात संपूर्णपणे स्वदेशी साहित्य वापरण्याचे उद्दिष्ट प्रिसिजन समूहाने बाळगले असल्याचे या वेळी पवार यांना सांगण्यात आले.

ठळक बाबी…
1) इलेक्ट्रिक बसची 23 आसन क्षमता
2) वातानुकूलित बस एका चार्जिंगमध्ये 180 किमी धावण्याची क्षमता
3) इलेक्ट्रिक बस बाजारात आणून खऱ्या अर्थाने मेड इन इंडिया संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न
4) प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय
वाहन उद्योग क्षेत्रातील ऐतिहासिक घटना
प्रिसिजन समूहाने इलेक्ट्रिक बस बनविली आहे. त्याची माहिती देण्यासाठी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन माहिती दिली. याबाबत शरद पवार यांनी प्रिसिजन समूहाच्या तंत्रज्ञानाचे व कंपनीच्या प्रगतीबद्दल कौतुक केले, याचा आम्हाला आनंद आहे.
- यतीन शहा, चेअरमन, प्रिसिजन उद्योग समूह