कोल्हापूर : काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दोघांनाही हवा असलेला कोल्हापूरलोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देत तेथून शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज होणाऱ्या महाविकासच्या बैठकीत शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याचे समजते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेनेची शकले झाल्यानंतर या मतदारसंघावर दावा सांगत काँग्रेसने शाहू छत्रपती यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, आपला पारंपरिक मतदारसंघ सहजासहजी काँग्रेसला सोडायला शिवसेना तयार नव्हती. या एकाच जागेवरून गेल्या आठवड्यापासून दोन्ही पक्षांत अंतर्गत जोरदार घमासान सुरू असताना सोमवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. यात प्रामुख्याने कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा झाली. या बैठकीत कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्याबाबत शिवसेनेने सहमती दर्शविली असल्याचे कळते. याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे