पुणे: ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द. मा. मिरासदार यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मिरासदार हे साहित्य वर्तुळात ‘दमा’ आणि ‘दादासाहेब’ या नावाने प्रसिद्ध होते.
मराठी साहित्यविश्वात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी विनोदी लेखनाची परंपरा जोपासली. हीच परंपरा द. मा. मिरासदारानी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या ‘व्यंकूची शिकवणी’, ‘माझ्या बापाची पेंड’, ‘शिवाजीचे हस्ताक्षर’, ‘भुताचा जन्म’, ‘माझी पहिली चोरी’, ‘हरवल्याचा शोध’ इत्यादी कथा वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत.