येस न्युज नेटवर्क : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांना घरी आणण्यात आलं होतं. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनिल अवचट यांनी केवळ साहित्य विश्वच नाही तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती. अनिल अवचट हे एक डॉक्टर होते, मात्र त्यांनी समाजसेवेतही मोलाचं योगदान दिलं. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.