सोलापूर : विजापूर रस्त्यावरील संभाजी तलावाचे सुशोभिकरण महापालिकेने हाती घेतले असून तलावातील गाळ काढण्यासाठी आंध्र प्रदेशातील एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.

तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला असून तलावात वाढलेली जलपर्णी देखील पूर्णपणे काढण्यात आली आहे. तलावाशेजारील वॉकिंग ट्रॅक तसेच राणी लक्ष्मीबाई पुतळा परिसरातील बगीचादेखील आता सुशोभित करण्याचे काम हाती घेण्यात येणे आवश्यक आहे .

भविष्यात संभाजी तलावात पुन्हा जलपर्णी वाढू नये यासाठी आता महापालिकेच्या उद्यान विभागाला काळजी घ्यावी लागणार आहे . वारंवार वाढणारी जलपर्णी ही महापालिकेची डोकेदुखी झाली होती. परंतु आता तलाव पूर्णपणे स्वच्छ झाला असून तलावाच्या परिसरात पक्षी मुक्तपणे विहार करत असल्याचे दिसत आहे.

तलावाला लागून असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या उद्यानामध्ये देखील या तलावातून पाणी देण्यात येते. सामाजिक वनीकरणाच्या उद्यानात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी विजापूर रस्ता परिसरातील लोकांची मोठी गर्दी असते संभाजी तलाव परिसरात दुपारच्या वेळेस तलावाकाठी बरेच जण येऊन बसत आहेत.

तलावा शेजारच्या हमरस्त्यावर मोठी झाडे असल्यामुळे या भागात सावली असते. त्याचप्रमाणे तलाव स्वच्छ झालेला असल्याने अल्हाददायक वातावरण दुपारच्या वेळेस अनुभवण्यास मिळत आहे.

फोटो – अनिकेत पाटील