सोलापूर : सोलापूर महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण पुढे करत महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी बगीचा ,जलतरण तलाव तसेच मोकळ्या जागा लिलाव करून भाड्याने तसेच विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याचप्रमाणे आता मनपा शिक्षण मंडळाकडील ज्या शाळा बंद पडल्या आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, त्याचा गैरवापर होऊ नये ,तसेच त्या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू होऊ नये यासाठी या सर्व शाळा भूमी मालमत्ता विभागाकडे वर्ग करणे तसेच या शाळा खाजगी संस्था, धर्मादाय शैक्षणिक संस्थांना ई-टेंडर द्वारे देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी सभेसमोर पाठवला आहे. येत्या 20 एप्रिल रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून या सभेचा अजेंडा दैनिकातून प्रसिद्ध झाला आहे त्यामध्ये आयुक्तांचा हा प्रस्ताव आहे अनेक प्रस्ताव जरी आयुक्तांनी पाठवले तरी याबाबत मनपा सभा निर्णय घेत नसल्यामुळे प्रशासनाचे प्रस्ताव अडगळीत पडतात आता तर निवडणुकीची आचारसंहिता आणि कोरोना त्यामुळे महापालिकेची सभा होत नाही त्यामुळे हा प्रस्ताव देखील असाच धूळखात पडणार आहे. महापालिकेच्या ५८ शाळा सुरु असून यामध्ये २०३ शिक्षक आहेत. आणि ५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या १५ ते २० वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या सुमारे १२ शाळांची जागा भूमी मालमत्ता विभागाने ताब्यात घ्यावी असे पत्र शिक्षण मंडळाने दिले आहे.