येस न्युज नेटवर्क : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यातील राजकारण बरेच बदलले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण त्यानंतरही राज्यातील राजकारण काही शांत झाले नाही. बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र करण्यास सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांच्यावर टिकेचा बाण सोडले जात आहेत. अशातच आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपृष्ठ सामनाला रोखठोख मुलाखत दिली आहे. शिवसेनेच्या बंडाळीनंतर सामनामधील ही पहिलीच मुलाखत असल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं असेल. आजच्या सामनामध्ये या मुलाखतीबाबात माहितीही देण्यात आली आहे.
गद्दारांनी केला पाठीवर वार, मग आता वाचाच शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’चा टणत्कार! अशा मजकूरासह सामनाच्या पहिल्याच पानावर मुलाखतीबाबात माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करत या मुलाखतीची माहिती दिली आहे. 26 आणि 27 जुलै रोजी ही मुलाखत आपल्याला पाहता येणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. ‘जोरदार मुलाखत..सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे..महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली मुलाखत..’ असेही ट्वीट संजय राऊत यांनी केलेय.