सोलापूर – स्वच्छ जल मन अभियानांतर्गत २५० संत निरंकारी अनुयायांनी रविवारी २६ फेब्रु. रोजी सकाळी ८ पासून १ वाजेपर्यंत धर्मवीर संभाजी तलाव येथील आजुबाजुचा परिसर स्वच्छ करण्याच्या उद्देशाने साडेपाच तास काम करत वीस घंटागाड्या भरून कचरा बाहेर काढून परिसर स्वच्छ केला.
यावेळी बोलताना संत निरंकारी सेवादलाचे प्रमुख इंद्रपालसिंह नागपाल म्हणाले की, परिवाराच्या वतीने धर्मवीर संभाजी तलाव परिसर आणि तलावातील जलपर्णी काढण्याचा संकल्प केला. जवळजवळ सहा तास २५० कार्यकर्त्यांनी श्रमदान केले. ही सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे. जितकी जमेल तितके अधिक करत रहावे हीच आमच्या सर्वांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिसरातील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा परिसरात जमा झालेला प्लास्टिक कचरा, अनावश्यक झुडपे, तलावातील जलपर्णी काढून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेची सुरुवात महापालिकेचे अति. आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आली. मनपाच्या झोन निरीक्षक वंदना वाघमारे यांनी सुद्धा श्रमदान करून कचरा नेण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करून दिली. या मोहिमेत माजी महापौर नलिनी चंदेले, माजी नगरसेविका पूनम बनसोडे, संगीताताई जाधव, रेल्वे सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम, संजय उस्तुर्गे, प्रवीण तळेकर, तुकाराम क्षीरसागर, तसेच मनपा आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती होती. संत निरंकारी सेवादल युनिट नं. ४९३ चे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.