संभाजी आरमारच्या स्थापनेपासून विजयादशमीनिमित्त प्रतिवर्षी मोठ्या दिमाखदार पद्धतीने “दसरा दरबार” आयोजित केला जातो. यंदाचा १५ वा दसरा दरबार मंगळवार दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे संपन्न होणार आहे. शिवकालापासून दसरा या सणास ऐतिहासिक महत्व असून छत्रपती शिवाजी महाराज देखील मोठ्या प्रमाणात दसरा साजरा करत असत. शिवछत्रपतींच्या विचारांचा तोच धागा प्रत्यक्ष कृतीत आणत संभाजी आरमार देखील विचारांचं सोनं लुटत मागील अनेक वर्षांपासून हा गुणिजनांचा आणि मावळ्यांचा दरबार भरवत आहे.
यंदाच्या वर्षी माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख (सातारा) यांचं “जनसेवेपायी काय झिजवावी, घाव सोसूनिया मने रिझवावी” या विषयावर मौलिक व्याख्यान आयोजित केले आहे. सोबतच हॉटेल निसर्गच्या माध्यमातून देशभरात सोलापूरचा ठसा उमटविणारे हॉटेल व्यावसायिक सुनील ठेंगील, सुप्रिया जंबो वडापावचा ब्रँड निर्माण करणारे बाबाजी कलाल, राष्ट्रीय जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी, राष्ट्रीय कबड्डीपटू कुमार चव्हाण यांचा सन्मान केला जाणार आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभहस्ते या दरबाराचा शुभारंभ केला जाणार आहे. पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता आणि उद्योजक सुनील बुरबुरे यांच्या प्रमुख उपस्थित हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे. तरी शिव विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवप्रेमी मावळे, सोलापूरकर जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी आरमाराचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले आहे.

