शनिवारी (19 मार्च) दुपारी सलमानच्या ऑफिसच्या मेल आयडीवर एक ई-मेल पाठवण्यात आला. सलमानला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आली आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी देण्यात आली आहे. याबाबत मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह तीन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शनिवारी (19 मार्च) दुपारी सलमानच्या ऑफिसच्या मेल आयडीवर एक ई-मेल पाठवण्यात आला. त्यामध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली .लॉरेन्सची मुलाखतीचा उल्लेखही ई-मेलमध्ये आढळला आहे. सलमाननं ही मुलाखत पाहिली असेलच, नसेल पाहिली तर लगेच पाहायला सांगा, असंही या हिंदीत लिहिलेल्या ई-मेलमध्ये लिहिलं होतं.
सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर त्याच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आली आहे. रात्रभर मुंबई पोलीस हे सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गस्त घालत होते. सलमानच्या घराबाहेर म्हणजेच गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गर्दी होणार नाही, याची खबरदारी पोलीस घेत आहेत.
ई-मेल पाठवून देण्यात आली धमकी
“गोल्डी भाईला (गोल्डी ब्रार) तुमचा बॉस सलमानशी बोलायचं आहे. तुम्ही मुलाखत (लॉरेन्स बिश्नोई) पाहिलीच असेल. कदाचित पाहिली नसेल, तर मला सांगा. मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा करायला हवी. आता वेळ आहे म्हणून सांगितलं, पुढच्या वेळी झटका देणार.”, असं सलमानला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे. रोहित गर्ग या आयडीवरुन हा मेल सलमानला पाठवण्यात आला आहे.
धमकीचा ई-मेल आल्यानंतर सलमान खानच्या टीमने या संदर्भात गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 120 बी, 506 (2) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा ई-मेल एका टोळीकडून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई पोलिसांनी गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हणाला होता लॉरेन्स बिश्नोई?
मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोई विचारण्यात आलं की, “सलमान खानला धमकी दिली का?” या प्रश्नाचं उत्तर लॉरेन्सनं “हो” असं दिलं होतं. तो म्हणाला की, “सलमान खानने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिली नाही. त्याने आमच्या भागात येऊन शिकार केली. त्यामुळे आमचा समाज त्याच्यावर चिडला. त्याने आमच्या समाजाची माफी मागावी. पण सलमानला मिळालेल्या धमकीच्या पत्रासोबत माझा काही संबंध नाही.”, असंही तो म्हणाला होता.