मुंबई : शरद पवार यांच्यावर पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहामध्ये चांगलीच राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. भोंगळेंनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. ‘नेमकचि बोलणें’ पुस्तक नरेंद्र मोदींना पाठवलं पाहिजे. नेमके बोलणें याची फोड करून त्यांना सांगू, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्र देशाला सतत विचार देत असतो. शरद पवार नेहमी देशाला विचार देत असतात, असंही राऊत म्हणाले.
पुस्तकाच्या भगव्या रंगाच्या कव्हरवरुन बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुमच्या विचाराला भगवे कव्हर घातलं आहे. हे सरकार बेरंग नाही. अवघा रंग एक झाला. महाविकास आघाडीचा जो ग्रंथ आपण निर्माण केला, त्याला आपण भगवं कव्हर घातलं आहे, असं राऊत म्हणाले. मी शरद पवारांना बसायला खुर्ची का दिली यावर टीका करणाऱ्यांनी शरद पवार यांची 61 भाषणे वाचली पाहिजे, असं राऊत म्हणाले.