येस न्युज मराठी नेटवर्क : गेली काही महिने नाईलाजाने कराव्या लागलेल्या लॉकडाउनचे भयंकर चटके आपण सहन केले आहेत. लाखो-करोडो लोकांचा रोजगार गेल्याने या लोकांची कुटुंबं मोठ्या अडचणीत आहेत. अशीच परिस्थिती आपल्याला पुन्हा आणायची नसेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या जबाबदारीचं कोणतंही ओझं नाही तर फक्त प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्यायची आहे,’ असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
लॉकडाउनच्या काळात आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या विषयावर वेळोवेळी भाष्य करणाऱ्या पवार यांनी हे आवाहन केलं आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर विविध गोष्टी खुल्या करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली होती. आता सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने पवार यांनी पालकांना आवाहन केलं आहे. ‘करोनाचे संकट पुन्हा वाढत असल्याने काही देशांत आणि आपल्या देशातही काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन करण्यात येत आहे. मात्र, आर्थिक दृष्टीकोनातून पुन्हा लॉकडाउन आपल्याला परवडणार नाही, त्यामुळं सर्वांनी काळजी घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.