सोलापूर :- जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक कुटुंबाला चांगल्या प्रतीचा व वेळेत धान्यपुरवठा होईल, याबाबत नियोजन करावे, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पुरवठा विभागाच्या बैठकित ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंके उपस्थित होते.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, धान्य साठवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गोदामाची स्वच्छता व सुरक्षितता तपासून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून गरजूंना दर्जेदार भोजन देण्यात यावे. त्यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवभोजन केंद्रांना नियमितपणे भेटी देऊन भोजनाची गुणवत्ता व स्वच्छता तपासावी. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बंद असलेली शिवभोजन केंद्रे प्राधान्याने महिला बचतगटांना चालवण्यासाठी द्यावीत. बंद केंद्रांबाबत माहिती सादर केली जावी तसेच शिवभोजन केंद्र चालकांची देयके तत्काळ अदा करण्यात यावीत. सांगोल्यातील चिकमहुद येथे नवीन शासकीय धान्य गोदाम उभारण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात एक लाख १३ हजार नवीन इष्टांकाची मागणी करण्यात आली आहे. मात्र सोलापूर ग्रामीण भागासाठी ४९८२१ आणि शहरी भागासाठी १४५२१ प्रमाणे ६४३४२ लाभार्थ्यांचा इष्टांक नुकताच वाढवून दिल्याचे मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले. वाढवून दिलेल्या इष्टांकाप्रमाणे लाभार्थ्यांना तत्काळ लाभ देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पुणे विभागातील आयएसओ मानांकन २०१५ साठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये ९ हजार १०० रेशन दुकाने, ८० धान्य साठवणुकीची गोदामांची रंगरंगोटी करणे, दुकानात दर फलक लावणे, अग्निशामक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरे, अन्नभेसळ विभागाचा परवाना, ड्रेस कोड या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती श्री कुलकर्णी यांनी दिली. यावेळी अन्न व पुरवठा मंत्री श्री भुजबळ यांनी या कामाचे कौतुक करून हा पथदर्शी कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे सांगितले.
बायोडिझेलच्या नावावर अवैध इंधन विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी वैधमापन आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्ह्यातील धान्य साठवणूक गोदामाची संख्या व त्यांची स्थिती तसेच रेशन दुकानांची संख्या, कार्डधारकांची संख्या, कार्यरत व बंद असलेल्या शिवभोजन केंद्राची संख्या ,धान्य वितरण व्यवस्था आदी बाबतची माहिती लांडगे यांनी दिली.