नवी दिल्लीः विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन सरकारने दोन दिवस आधीच गुंडाळले . अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार होते . विरोधकांचा गदारोळ आणि घोषणाबाजीमुळे आधी लोकसभा आणि नतंर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले गेले . लोकसभेचे कामकाज दुपारी साडेबारा वाजता तहकूब झाले . तर राज्यसभेच १२७वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा गदारोळ केला आणि नंतर सभात्याग केला. यामुळे राज्यसभेचे कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब केले गेले . सरकारने राज्यसभेत विमा व्यवसाय दुरुस्ती सुधारणा विधेयक मांडलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक राज्यसभेत मंजूर केले गेले . यानंतर विरोधकांनी विधेयकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहाच्या मध्यभागी आले. काही खासदारांनी कागदपत्रे फाडली आणि सभागृहात उधळली.
विरोधकांची घोषणाबाजी आणि गदारोळामुळे सभापतींना सभागृहाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले आहे. हे विधेयक जनतेच्याविरोधात आणि देशाच्या आर्थव्यवस्थेचे नुकसान करणारे असल्याचा आरोप विरोधी खासदारांनी केला. विमा कंपन्यांना लाभ पोहोचवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यसभेत मंगळवारीही विरोधी पक्षांच्या खासदारांनी गदारोळ केला. काही खासदार तर बाकावर चढून आणि तिथे बसून घोषणाबाजी करत होते. राज्यसभेतील विरोधकांचा गदारोळ आणि त्यांच्या गैरवर्तनावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली लोकशाहीच्या मंदिराचे पावित्र्य भंग केले गेले. विरोधकांच्या गैरवर्तनाने आपल्याला रात्रभर झोप लागली नाही. सभागृहाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचू नये, यासाठी आपण सतत प्रयत्न केले. संसद लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर आहे. या मंदिराचे पावित्र्य भंग होता कामा नये, असे नायडू म्हणाले. विरोधकांच्या गदारोळातच ‘सामान्य विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) सुधारणा विधेयक २०२१’ हे राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे सरकारी विमा कंपन्यांमधील खासगी गुंतवणूक सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. तसेच सभागृहाच्या निवड समितीकडे पाठवण्याची मागणी केली. पण त्यांची ही मागणी सभापतींनी फेटाळली. विरोधकांनी घातलेला गदारोळ हा अभूतपूर्व आहे. गदारोळ घालणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई झाली पाहिजे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी फक्त गदारोळच केला नाही तर पॅनेल चेअरमन, टेबल स्टाफ आणि सरचिटणीसांवरही हल्ला केला. हा प्रकार निषेधार्ह आहे. महिला सुरक्षा रक्षकांशीही विरोधी खासदारांनी गैरवर्तन केल. यामुळे विरोधी पक्षांच्या खासदारांचा हेतू उघड झाला आहे. या गदारोळाप्रकरणी विशेष समिती नेमावी आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांनी केली.