राज्यात दडी मारलेला पाऊस आता पुन्हा सक्रीय झाला असून आज हवामान खात्याकडून अनेक महत्त्वाच्या शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ३-४ तासांत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग घाट परिसरात पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर रायगड मुंबई आणि उपनगरं, आजूबाजूच्या काही भागांवर ढग तीव्र असून यामुळे पुढच्या २-३ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील काही भागांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत जोरदार पाऊस होईल तर गोव्यातही पुढच्या काही तासांमध्ये तुफान पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसाार, राज्यात पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.