मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. विधीमंडळ पक्षात बहुमत कुणाचं हा एकमेव निकष महत्त्वाचं आहे, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणात निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितलं. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार ही पक्षाची लढाई अजितदादांनी जिंकली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचा संदर्भ देत आणि आमदारांच्या संख्याबळातील बहुसंख्येच्या आधारे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यामध्ये, पक्षाचे स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील आकलन व नेतेपदाची संरचना लक्षात घेण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवारा गटाला बहुमत स्वीकारलं जात नाही, असे नार्वेकर यांनी म्हटलं.तसेच, मूळ पक्ष हा विधिमंडळ बहुमतावर ठरणार असल्याचे सांगत अजित पवार गटाला ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याने अध्यक्षांनी हा निर्णय दिला.