महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या व दैनंदिन गरजेच्या प्रश्नांवर आंदोलन, जनजागरण सभा, जेल भरो व मंत्रालयावर आक्रमक मोर्चा, राज्यातील प्रागतिक पक्षांच्या वतीने धडक कार्यक्रम
“शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त हमीभाव, पीक नुकसानीची योग्य नुकसान भरपाई, शेतमजूर व कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा, राज्यातील महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, व ओबीसी वर होणारे अन्याय व अत्याचार, महागाई व बेरोजगारीचे जटिल प्रश्न, संविधानिक मूल्यांचे रक्षण व त्यासाठी फॅसिझमच्या षडयंत्रास कसून विरोध, या संदर्भातील प्रमुख मागण्यांसाठी राज्य पातळीवर सर्वप्रथम महाराष्ट्र जनजागरण सभा, त्यानंतर तालुका व जिल्हानिहाय जेल भरो आंदोलन आणि त्यानंतर मंत्रालयावर विराट मोर्चा असा आंदोलनात्मक कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील संबंधित सर्व घटकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे” असे आवाहन प्रागतिक पक्षांच्या वतीने कॉ. डॉ. अशोक ढवळे, माजी खासदार राजू शेट्टी, कॉ. डॉ. भालचंद्र कांगो, भाई आ. जयंत पाटील, आ. अबू असीम आझमी, आमदार हितेंद्र ठाकूर व आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांच्या वतीने करण्यात आले आहे.
निश्चित व जाहीर करण्यात आलेला कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
महाराष्ट्र जनजागरण सभा
सोलापूर – शनिवार 2 सप्टेंबर, पुणे – रविवार 3 सप्टेंबर, कोल्हापूर-सोमवार ४ सप्टेंबर , नंदुरबार- शुक्रवार 8 सप्टेंबर, नाशिक – शनिवार 9 सप्टेंबर, संभाजीनगर – रविवार 10 सप्टेंबर, नांदेड – सोमवार 11 सप्टेंबर, अमरावती – शुक्रवार 15 सप्टेंबर, गडचिरोली व चंद्रपूर – शनिवार 16 सप्टेंबर, नागपूर – रविवार 17 सप्टेंबर, पालघर – मंगळवार 3 ऑक्टोबर, पनवेल/रायगड – बुधवार 4 ऑक्टोबर, व मुंबई – रविवार 8 ऑक्टोबर.
जेल भरो आंदोलन
सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र स्थानिक जिल्हा व तालुका पातळीवर
मंत्रालयावर मोर्चा
मंगळवार, 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले स्मृतिदिनी
प्रागतिक पक्षांच्या या आघाडीमध्ये राज्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष, मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन, रिपाई (सेक्युलर) व श्रमिक मुक्ती दल हे १३ घटक पक्ष सहभागी आहेत.
सोलापूर येथे दि २ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं ठिक ५:०० वा. होणाऱ्या पहिल्या सभेच्या निमित्ताने प्रागतिक पक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात सभेच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम (मास्तर) असतील. तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. भाई जयंत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ सुभाष लांडे, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्रचे महासचिव साथी प्रताप होगाडे, समाजवादी पक्षाचे राज्य महासचिव डॉ रऊफ शेख, महाराष्ट्र राज्य सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव श्री धिरज बगाडे व उर्वरित पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून प्रत्येक घटक पक्षाने आपल्या स्तरावर प्रचार मोहीम आखली आहे. त्यात रिक्षा प्रचार, वस्ती पातळीवर सभा आदींचा समावेश आहे. या सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असून आगामी कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात येणार असून तरी सर्व सुज्ञ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन प्रागतिक पक्षांच्या वतीने करण्यात आले. या पत्रकार परिषदेत अँड.एम.एच.शेख यांनी माहिती दिली.
माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच शेख, समाजवादीचे अबू तालीम डोंगरे,एजाज अहमद अरब,महंमद इसाक डोका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे , दीपक निकंबे, अँड.अनिल वासम, शाम आडम आदी उपस्थित होते.