कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
19

सोलापूर (प्रतिनिधी) : सहकार तपस्वी कै. आमदार ब्रह्मदेव दादा माने यांच्या 21व्या स्मृतिदिनानिमित्त तसेच एसपीएम पॉलिटेक्निक कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 3 ते 6 सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे मुख्य विश्वस्त तथा माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एसपीएम पॉलिटेक्निकचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्याचे व कै. आमदार ब्रह्मदेव दादा माने यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून चार दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती माजी आमदार दिलीप माने यांची असणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून एसपीएम पॉलिटेक्निकलच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाला शिवरत्न शेटे, प्राध्यापक गणेश शिंदे, प्राध्यापक यशवंत पाटणे, प्राध्यापक श्रीमंत कोकाटे, यांच्यासह माजी आमदार दिलीप सोपल, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, धनाजीराव साठे, राजन पाटील या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.

यंदाच्या वर्षी रविवार, 3 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे चला नवी पिढी घडवू या या विषयावर व्याख्यान होणार आहे.
सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सांगलीचे वसंत हंकारे यांचे बाप समजून घेताना या विषयावर तर मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता एलएचपी कंपनीचे व्यवस्थापक संचालक शरद ठाकरे आणि किर्लोस्कर फेरस चे प्लांट हेड संतोष गुमास्ते यांची आजच्या उद्योग जगतापुढील आव्हाने या विषयावर प्रकट मुलाखत होणार आहे तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी साडेअकरा वाजता प्रिसिजन कॅम्पशॉपचे कार्यकारी संचालक करण शहा यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार शिवाजी सुरवसे घेणार आहेत.

बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विद्यार्थी जीवनातील ताण तणाव व्यवस्थापन या विषयावर प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉक्टर प्रसन्न खटावकर यांचे व्याख्यान होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे च्या प्रांगणात होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी केले आहॆ.