भारतीय न्याय संहिता २०२३ हिट अंड रन कायदा रद्द करा- रिक्षाचालक कृती समितीची मागणी
सोलापूर :- सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षाचालक हिताविरोधी निर्णयास संघटनेची संमती घेण्यासाठी आज दि. १० जानेवारी २०२३ रोजी बैठक आयोजित केली. बैठकीच्या विषयात रिक्षा चालकांच्या गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा होत असलेल्या मागण्याबाबत कसलाच विचार करण्यात आला नाही. सोलापूर शहरातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता रिक्षाची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली. पुण्यासारख्या रिक्षा चालकाच्या आर्थिक मिळकत दुप्पटीने असलेल्या पुणे शहरात एलपीजी इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा २० वर्षे व सीएनजी इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा २५ वर्षे अशी वाढवून दिली आहे. मा. केंद्र शासनाने वाहनाच्या वयोमर्यादेबाबत नवीन नियम करून कांही अटी शर्तींचा समावेश करून वाहनांचे नूतनीकरण करून देण्यासंदर्भात अधिसूचना काढूनही सोलापूर कार्यालय जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करून रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान करत आहे. गेल्या ४ वर्षापासून केवळ रिक्षा चालकांच्या विषयांवर बैठका घेऊन “बोलाची कढी बोलाचा भात” असे धोरण सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय राबवत असल्याने आज रोजीच्या आयोजित बैठकीत कृती समितीचे सर्व पदाधिकारी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मौन धारण करत कार्यालयाच्या या वृत्तीचा निषेध केला आहे.
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात बहुतांश चाचण्या या नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाकडून करण्यात येते. हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक त्यांच्या मनाला येईल ते नियम करून रिक्षा चालकांची पिळवणूक करण्यात येते. नागरिकांच्या सनदेप्रमाणे कोणतेही काम वेळेत पूर्ण होत नाही. आर्थिक कारणांवरून कामात दिरंगाई होत असते. या व अशा अनेक बाबींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करूनही कारवाई होत नसल्याने इक प्रकारचा असंतोष चालकांमध्ये वाढत आहे.
केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता २०२३ मध्ये दुरुस्ती करून हिट अँड रन कायद्याअंतर्गत १० वर्षेशिक्षा व ७ लाख रुपये दंडाची तरतूद केल्याने वाहन चालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून ठीक ठिकाणी या कायद्याविरोधात सनदशीर मार्गाने आंदोलने होत आहेत. या हिट अँड रन कायद्यामधून रिक्षा चालकही सुटलेला नाही. म्हणून याची जाणीव ठेवून भविष्यात या कायद्याविरोधात उग्र आंदोलन करण्याची तयारी रिक्षा चालकांनी करावी असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात येऊन मा. शासनाने हिट अँड रन कायद्यातील जाचक तरतूदी मागे घेऊन हा कायदा रद्द करावा अशी या निमित्ताने मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलन प्रसंगी कृती समितीचे श्री अजीज खान, सलीम मुल्ला, आरिफ मणियार, सुनील भोसले, अनिल मोरे, कमलाकर, रफिक पिरजादे, रियाज सय्यद, हमीद दौलताबाद, शौकत बडेघर शौकत सय्यद,मंगेश मानेकमलाकर वाघमारे ,मल्लीकार्जुनबिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते