सोलापूर : दिवसेंदिवस विविध प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही सर्वांची असून त्यात प्रत्येकाने आपले सहकार्य द्यावे ही काळाची गरज आहे असे उद्गार सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी केले. शिवकृपा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पर्यावरण पूरक गणेशमूर्तीच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.
बाळीवेस येथील जाजू भवन येथे हे प्रदर्शन दिनांक 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान सर्वांसाठी आले असून येथे चार दिवसापासून तीन फुटापर्यंत च्या मातीमधून बनविलेल्या विविध प्रकारातील आकर्षक गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. सौ सातपुते यांच्या हस्ते गुरुवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शांती टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या संचालिका सुजाता सक्करगी, राष्ट्रीय कीर्तीच्या भारूडकार गार्गी काळे, ज्येष्ठ लेखिका सूनेत्रा पंडित, उद्योजिका जानवी माखिजा, माजी प्रशासकीय अधिकारी पौर्णिमा डोळे, पथनाट्य चळवळीचे उदगाते आशुतोष नाटकर, फोन पे कंपनीचे व्यवस्थापक धानेश सावळगी, ऑल इंडिया धनगर समाज पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मनीषा माने, श्रीमती निर्मला विभुते आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. भारूडकार गार्गी काळे यांनी आपल्या खड्या आवाजात गणेश वंदना व गणेश गीत सादर केले. कार्यक्रमाचा समारोप पर्यावरण प्रतिज्ञाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्त्या वैशाली गुंड यांनी केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी संजय गुडनाळे, कसबा गणपती प्रतिष्ठानचे रतीकांत हादरे, प्रा. अमित कासार, शिवानंद शिलवंत, अजय हक्के, विनोद पालकर, प्रा. शेफाली विभूते व वृक्ष विनायकच्या मधूर सोलापूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अक्षरातून साकारले बाप्पा
सोलापूरसह राज्यभर आणि परदेशातही ज्यांच्या कलेची कीर्ती आहे असे, अक्षर व गणेश मित्र धानेश सावळगी यांनी वृक्ष विनायक हे नाव गणेशाच्या रुपात अवघ्या दीड मिनिटात स्केचपेनने कागदावर साकारले.
चार इंच ते तीन फुटाचे पंचेचाळीस प्रकार : बाळीवेस परिसरातील लातूर बँकेच्या वर असणाऱ्या या प्रदर्शनामध्ये विविध 45 प्रकारातील मातीच्या गणेश मूर्ती उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या सर्व मूर्ती माझ्या मूर्तिकारांनी बनविलेल्या आहेत.