जुना पुना नाका ते पत्रकार भवन उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या विविध विभागाशी पाठपुरावा करून त्या जागेचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महापालिकेच्या उड्डाणपूलच्या भूसंपादनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी भूसंपादन अधिकारी प्रशांत देशमुख, माढा प्रांत ज्योती आंबेकर, भूसंपादन अधिकारी श्रावण क्षीरसागर, मंगळवेढा प्रांत अमित माळी, सोलापूर महापालिकेच्या उप अभियंता श्रीमती आकुलखवार यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुंभार आशीर्वाद पुढे म्हणाले की, जुना पुना नाका ते पत्रकार भवन उड्डाण पुलाचे सरकारी जागेचे भूसंपादनाचे प्रस्ताव महापालिकेने त्वरित पाठवावेत. या अंतर्गत येणारे केंद्र शासनाच्या टपाल विभाग, रेल्वे व अन्य संबंधित विभागाशी महापालिकेने सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. या उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यासाठी पुणे व अन्य शहरात उड्डाणपुलाची भूसंपादन प्रक्रिया कशा पद्धतीने करण्यात आली याबाबत माहिती घेऊन त्या पद्धतीने या उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया त्वरित पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सूचित केले.
जुना पुना नाका ते पत्रकार भवन या उड्डाणपुलाच्या मार्गात येणाऱ्या राज्य सरकारच्या जागेचे भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या उप अभियंता श्रीमती अकुलखवार यांनी बैठकीत दिली. त्याप्रमाणेच केंद्र शासनाच्या विविध विभागाशी पाठपुरावा सुरू असून त्यांच्या विभागाकडून भूसंपादन प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रस्ताव आलेले नाहीत. ते वेळेत येण्यासाठी महापालिकेच्या वतीने पाठपुरावा करण्यात करून केंद्र शासनाच्या विभागांना या अनुषंगाने स्मरण पत्र ही देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत भूसंपादन विषयी माहिती घेतली. सर्व संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, आशी सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी मोहोळ पंढरपूर महामार्ग तसेच सोलापूर अक्कलकोट महामार्ग अंतर्गत भूसंपादन प्रक्रिये अंतर्गत शिल्लक राहिलेल्या रकमेच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन हा निधी संबंधित प्रक्रियेच्या अनुषंगाने खर्च करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.