• नाटककार सतीश आळेकर लिखित ‘ठकीशी संवाद’ या नाटकाचा प्रयोग व कलाकारांशी मनसोक्त गप्पा !
• हजारो अंधांना रोजगार मिळवून देणारे राष्ट्र्पती पुरस्कार प्राप्त उद्योजक डॉ भावेश भाटिया यांची प्रकट मुलाखत !
• आपल्या अपंगत्वालाच आपले शस्त्र बनवून काम करणाऱ्या मिनाक्षी निकम व दीक्षा दिंडे यांना प्रिसिजन सामाजिक पुरस्कार !
• पारंपरिक अभंगांना नव्या पिढीच्या नव्या ढंगात सादर करणारा कार्यक्रम ‘ अभंग रिपोस्ट’…
सोलापूर- प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या १८, १९ आणि २० ऑक्टोबर २०२४ रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे ”प्रिसिजन गप्पा’ आयोजिण्यात आल्या आहेत. सोलापूरकर रसिकांना दिवाळी आधीच सांस्कृतिक गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे. प्रिसिजन गप्पांचं हे १६ वं वर्ष आहे. संगीत, नाटक, साहित्य, विविध कलांच्या आस्वादासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या गप्पांनी सोलापूरचं सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध केलं आहे. यावर्षीही दर्जेदार विषय, आगळीवेगळी व्यक्तिमत्वं आणि त्यांच्यासोबतच्या सकस गप्पा असा त्रिवेणी संगम घडणार आहे अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली. त्यावेळी प्रिसिजन उद्योगसमूहाचे चेअरमन श्री.यतिन शहा हे उपस्थित होते.
गेल्या १५ वर्षात प्रिसिजन गप्पांच्या या व्यासपीठावर अनेक दिग्गजांना सोलापूरकरांनी ऐकलं. पाहिलं. मंत्रमुग्ध झाले. साहित्य, नाटक, सिनेमा, संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अशाच कर्तृत्ववान व्यक्तींना आपण यंदाही भेटणार आहोत. प्रिसिजन गप्पांना शुक्रवार, दि.१८ नोव्हेंबर २०२४ सुरवात होईल. पहिल्या दिवशी लेखक, नाटककार सतीश आळेकर लिखित ‘ठकीशी संवाद’ हे प्रायोगिक नाटक सादर होईल. प्रसिद्ध अभिनेता सुव्रत जोशी आणि गिरीजा ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रयोगानंतर लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांची मिलिंद कुलकर्णी हे प्रकट मुलाखत घेणार आहेत. २२ वर्षानंतर सतीश आळेकर यांचे हे नाटक रंगभूमीवर येत आहे, किंचित गालातल्या गालात किंवा मनमोकळेपणाने हसत स्वतःमध्ये खोलवर डोकावून पाहायला लावणारे हे नाटक आहे.
शनिवार दि.१९ ऑक्टोबर रोजी गप्पांच्या दुसऱ्या दिवशी प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान केले जातील. चाळीसगाव जि जळगाव येथील स्वयंदीप संस्थेला या वर्षीचा ’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात येणार आहे, संस्थेच्या सचिव मीनाक्षी निकम या हा पुरस्कार स्वीकारतील. सन्मानचिन्ह आणि रूपये तीन लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर पुणे येथील दिव्यांगांच्या हक्कासाठी, सर्वसमावेशक शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या दीक्षा दिंडे यांना “स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार” पुरस्कार देण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह आणि रूपये दोन लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते, हजारो अंधांना रोजगार आणि सन्मानजनक आयुष्य मिळवून देणारे राष्ट्र्पती पुरस्कार प्राप्त उद्योजक डॉ. भावेश भाटिया यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ भावेश भाटिया तसेच दोन्ही पुरस्कार प्राप्त संस्थांचे प्रतिनिधी यांची प्रख्यात निवेदिका आणि मुलाखतकार अनघा मोडक या मुलाखत घेतील.
रविवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी पारंपरिक अभंगांना, संत रचनांना नवीन पिढीच्या नव्या भाषेत अर्थात प्यूजन संगीताचा, आधुनिक वाद्य संगीताचा साज देत सादर होणारा भन्नाट कार्यक्रम ‘ अभंग रिपोस्ट’ आयोजिक करणयात आला आहे. प्रतीश मस्के, अजय वाव्हाळ, तुषार तोत्रे, विराज आचार्य, दुष्यंत देवरुखकर आणि स्वप्नील तर्फे हे कलाकार नव्या पिढच्या नव्या ढंगात अभंग सादर करतील.
प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी ६.२५ वा. गप्पांना प्रारंभ होईल. नेहमीप्रमाणेच शिवछत्रपती रंगभवनमध्ये या गप्पा आयोजित केल्या आहेत. रंगभवनच्या प्रांगणातही आसनव्यवस्था व एलईडी प्रोजेक्टरद्वारे कार्यक्रम पाहण्याची सोय असेल. तसेच रसिकांच्या पार्किंगची व्यवस्था वोरोनोको शाळेच्या मैदानावर करण्यात आली आहे. रसिक सोलापूरकरांनी ’प्रिसिजन गप्पां’चा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन डॉ. सुहासिनी व श्री. यतिन शहा यांनी केले.
पुरस्कारप्राप्त संस्थांचा परिचय-
प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कारप्राप्त संस्था – स्वयंदीप संस्था, चाळीसगांव, जळगाव.
स्वतःच्या अपंगत्वावर मात करत उद्योजिका बनलेल्या आणि शेकडो दिव्यांगांना स्वावलंबी बनण्याची प्रेरणा देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील मीनाक्षी निकम यांना प्रिसिजनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दिला जाणार आहे. अपंगत्वामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाने निराश न होता त्यालाच आपले शस्त्र बनवित मीनाक्षी निकम यांनी असंख्य अपंगांना आत्मनिर्भर बनविले.
मीनाक्षी निकम यांना वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच पासून पोलिओनं अपंगत्व आलं होतं. त्यात १२ वर्षांच्या असताना पितृछत्र हरपलं, वय वाढू लागलं तसतशा जबाबदाऱ्याही वाढू लागल्या. आई आणि चार भावंडांचा सांभाळही करायचा होता. मग जुन्या कपडय़ांना टिपा मारून द्यायचं काम सुरु केलं. आज ‘राज फॅशन डिझाइन’ या आपल्या कॉस्च्युम डिझाइनचा उद्योग तर त्यांनी स्वबळावर भरभराटीला आणलाच, परंतु असंख्य अपंग, विधवा, गरजू स्त्रियांना मोफत शिक्षण देत त्यांना स्वबळावर उभं केलं आहे. इतकंच नव्हे तर अपंगांच्या वाटय़ाला सरकारी मनस्ताप येऊ नये म्हणून अंपग पुनर्वसनाचेही काम त्यांनी हाती घेतले आहे. अपंगांना लागणारी साधने पुरविणे, राज्य अपंग विकास महासंघ व प्रहार क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून अपंगांना दाखले तसेच सरकारी योजनांकडून साह्य़ मिळवून देणे, यात त्या गर्क असतात. आपल्यावर झालेल्या अन्यायाने निराश न होता त्यालाच आपले शस्त्र बनवित स्वत:लाच नव्हेत तर असंख्य अपंगांना आत्मनिर्भर आणि स्वयंसिद्ध बनविले.
स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार:- दीक्षा दिंडे
“हौसले बुलंद हो, तो मंजिले दूर नही होती” हे वाक्य जगणारी आणि जगवणारी पुण्याची दीक्षा दिंडे. कात्रज येथील सोनवणे चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणारी दीक्षा ही जन्मजात दिव्यांग आहे. आई शिवणकाम करायची आणि वडील रिक्षा चालवून घरखर्च भागवत होते. त्यातच २००५ साली वडिलांना अपघात झाला, या अपघाती आजारपणातच त्यांचं निधन झालं. आईनं मात्र येणाऱ्या अडचणींना तोंड देत तिचं शिक्षण सुरू ठेवलं. परिस्थिती बेताची असली, तरी ती मात्र आपल्या विकलांगतेपुढं झुकणारी नव्हती.
जन्मापासून दीक्षा दिंडे हिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले आहे.आईच्या मदतीशिवाय घराच्या बाहेरसुद्धा निघू शकत नाही तिच मुलगी आज अनेक देशांमध्ये ‘मोटीवेशनल स्पीकर’ म्हणून जाते आहे. ती स्वत:ला ‘गर्ल ऑन व्हील्स’ नाही तर ‘गर्ल ऑन विग्ज’ म्हणते. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या मुलांसाठी पुण्याच्या झेड ब्रिजच्या खाली शाळा सुरु केली. दिव्यांग मुलांच्या समस्या आणि किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी अशा विविध विषयांवर अनेक संस्थांसोबत दीक्षा आज काम करीत आहे. दीक्षाच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने ‘वर्ल्ड अॅट स्कूल’ या उपक्रमासाठी तिची ‘वर्ल्ड युथ एज्युकेशन अंबॅसेडर’ किंवा ‘जागतिक युवा शिक्षण राजदूत’ म्हणून निवड केली.
ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित चेवनिंग स्कॉलरशिपचीही ती मानकरी ठरली आहे .जगभरातील ६८ हजार विद्यार्थ्यांनी या स्कॉलरशिप साठी फॉर्म भरला होता. त्यातून जगातील फक्त एक ते दीड हजार विद्यार्थ्यांचे निवड होते, त्यामध्ये दीक्षा दिंडे हिची निवड झाली. आपल्या अपंगत्वावर मात करत दीक्षाने मिळवलेलं यश तरुणांसाठी मोठी उमेद आहे.