सोलापूर दि. २० नोव्हेंबर- वीज कंपनीवर ऊर्जामंत्र्यांचा विश्वास आहे, परंतु ग्राहकांवर नाही…राज्यातील जनतेवर अविश्वास दाखवणे निंदनीय आहे. राज्य सरकारने १०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनावरून यु टर्न मारला आहे. उलट ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम उर्जामंत्र्यांनी केले आहे. वीज बिलात सवलत नाही, मदत नाही. वीज बिले जबरदस्तीने वसुल करण्याची ही ठाकरे सरकारची जुलमी राजवट असल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
भारतीय जनता पार्टी पुणे पदवीधार मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघातील अनुक्रमे संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ सोलापूर दौ-यावर आलेले विरोधी पक्ष नेते यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी दरेकर यांनी सांगितले की, या सरकारमध्ये समन्वय नाही. याच कारण हे सरकारचे टोलवाटोलवीचे काम सुरु आहे. वीज बिलाचा निर्णय तातडीने होऊ शकतो. मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि अर्थमंत्री हे तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ शकतात, पण या सरकारमध्ये इच्छाशक्तीचाच अभाव आहे. हे सरकार बेफिकिर आहे. यांनी जनतेच्या प्रश्नांचे काही घेणे देणे नाही, अशी टिका करतानाच दरेकर म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी या ठिकाणी मुद्दाम काँग्रेसला अश्या प्रकारचा निर्णय न घेऊन जनतेच्या नजरेत पाडण्याचे प्रयत्न करत आहे. पण दुर्दैवाने कॉंग्रेसलाही स्वाभिमान नाही.
वाढीव वीज बिलांसदर्भात भाजपाची भूमिका अतिशय आक्रमक आहे. येत्या सोमवारी राज्य सरकारच्या वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ वीज बिल होळीचे आंदोलन होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या प्रश्नांची जराही काळजी सरकारला असेल तर वाढीव वीज बिलासाठी सरकारने तात्काळ ५ हजार कोटीचे पॅकेज द्यावी अशी आमची मागणी आहे.
पुणे पदवीधर मतदार संघ हा पारंपरिक भाजपाला मतदान करणारा मतदार संघ आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी पदवीधरांसाठी , शिक्षकांसाठी सरकारच्या माध्यमातून मंत्री म्हणून जे काम केले त्याचा उपयोग या उमेदवारांना मिळणार असल्याचे सांगताना ते म्हणाले की, ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण होत आले तरी अजूनही कुठल्याही प्रकारे जनतेला दिलासा मिळाला नाही. ना शेतक-यांना मदत, ना बेरोजगारांना रोजगार, ना कर्मचाऱ्यांना पगार, ना अतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्याला मदत आणि आता वाढीव वीज बिलाच्या विषयामुळे सरकारच्या विरोधात जनतेमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीत मतदानाच्या माध्यमातून संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांना मतदार निवडून देतील असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
केवळ बिहार विधानसभा निवडणुकीत नाही तर इतर राज्यांमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला नागरिकांनी मोठा जनाधार दिला आहे. आता गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील सरकार अपयशी ठरल्यानंतर या निवडणूका होत आहेत आणि म्हणून या निवडणूकांना अनन्य साधारण महत्व असल्याचेही त्यांनी सांगितले.